जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. नुकतेच पारोळा तालुक्यातील सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे बिल मिळावे तसेच इतर कामांची वर्क ऑर्डर काढावी म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २३) संशयिताना ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने सावखेडे तुर्क ग्रामपंचायत परिसरात विकासकामांचा ठेका घेतला होता. त्याचे बिल मिळावेतसेच इतर कामांच्या वर्कऑर्डर मिळण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने बुधवारी (दि. २३) पारोळा गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६), सुनील अमृत पाटील (वय ५८), गणेश प्रभाकर पाटील (वय ५०), अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७) आणि योगेश साहेबराव पाटील (वय ३७) यांना ताब्यात घेतले असून, पारोळा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.