जळगाव मिरर | २६ जुलै २०२३
देशात गेल्या अनेक महिन्यापासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिसांचार सुरु असून आता महिलावर देखील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरमधील एका दुकानात स्थानिक महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला निलंबित करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने काल (मंगळवारी) याबाबतची माहिती दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये, हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद, त्याच्या गणवेशात असताना महिलेचा विनयभंग करत तिला शिवीगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.
बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितले की, ही घटना २० जुलै रोजी इंफाळच्या पश्चिम जिल्ह्यात घडली आहे. निमलष्करी दलाकडे तक्रार आल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्याच दिवशी जवानाला निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, दलाच्या 100 व्या बटालियनशी संबंधित हेड कॉन्स्टेबलविरुद्ध न्यायालयीन चौकशीची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. या जवानाला ईशान्येकडील राज्यात जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले होते. सुपर मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जवान महिलेवर विनयभंग करताना दिसत आहे. हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद असे या जवानाचे नाव आहे. एनडीटीव्हीशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ही घटना 20 जुलै रोजी इंफाळमधील पेट्रोल पंपाजवळील एका दुकानात घडली. हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. त्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.