प्रत्येक तरुणी व तरुणाच्या आयुष्यात लग्न हा खूप महत्वाचा विधी सोहळा असतो, अशाच एक लग्नासाठी वर-वधू यांच्यासह परिवारातील सर्वच लोक लग्नाची तयारी करून मंदिरात लग्न करण्यासाठी पोहचले पण हे लग्न होण्याआधीच भावी वराचा मृत्यू तर वधू जखमी असल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे.
लग्नाचा सोहळा सुरू असताना अचानक नवरा मुलगा व नवरी मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्यामुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तर, तरुणीची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशय्येवर आहे. तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर तिला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करत आहेत. कनाडिया परिसरात असलेल्या एका आर्य समाज मंदिरात लग्नाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली होती. असं असतानादेखील दोघांनी असा टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास पोलिस करत आहेत.
लग्नाला काही तास शिल्लक असतानाच भावी वर आणि वधुमध्ये काही कारणांवरुन वाद झाले होते, अशी माहिती तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी दिली आहे. वादानंतर निराश असलेल्या नवरदेवाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या होणाऱ्या पतीने विष घेतल्याची बातमी वधूला कळताच तिनेही कोणताही विचार न करता लगेचच विष घेतले. या घटनेमुळं लग्नाला आलेल्या नातेवाईकांमध्येही गोंधळ निर्माण झाला. नवरदेवानंतर नवरीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळताच कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. नातेवाईकांनी लगेचच दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू झाला होता. तर, नवरीची प्रकृती गंभीर असून तिला व्हॅन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या कुटुंबीयांनी तरुणीसह तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणी सातत्याने आमच्या मुलावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण करिअरच्यादृष्टीने आमचा मुलगा अद्याप सेटल नव्हता त्यामुळं त्याने तिच्याकडे लग्नासाठी दोन वर्षांचा वेळ मागिला होता. पण ती ऐकायलाच तयार नव्हती, असं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर, मुलावर अविश्वास दाखवून तिने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रारदेखील केली होती. मात्र, पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगितल्यावर त्यांच्यातील वाद मिटले होते. त्यानंतर मुलाने लग्नाला तयार असल्याचे म्हटले. दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांचा साखरपुडादेखील झाला होता. लग्नाचीही तयारी घरच्यांनी सुरू केली होती. मात्र, ऐन लग्नात असा काय वाद झाला की त्याने आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.