जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२६
जामनेर तालुक्यातील जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. इंदूरहून हुबळीकडे औषधी माल घेऊन जाणारा ट्रक साईडपट्ट्यांना भराव नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून ट्रक व औषधी मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरजे ०९ जीसी १९७५ क्रमांकाचा ट्रक ग्लुकोज पावडर, सलाईन व इतर औषधे घेऊन पहाटेच्या सुमारास वाकोद परिसरातून जात होता. महामार्गालगतच्या साईडपट्ट्यांमध्ये खोदकाम करून भराव न टाकल्याने रस्त्याच्या कडेला मोठी खोल जागा निर्माण झाली आहे. वाहन चालविताना ट्रकचा ताबा सुटून तो या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. अपघातात चालक व क्लिनरला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून तयार झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या खोदून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामध्ये भराव न टाकता त्या उघड्याच सोडल्याने वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची व पादचाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांकडून संबंधित विभागाने तातडीने साईडपट्ट्यांना भराव टाकून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.




















