जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४
राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले असून नुकतेच दि.२२ रोजी शिवसेनेच्या शिंदे गटाने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पहाटे गुवाहाटीला जाऊन तेथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. शिंदे उद्या गुरुवारी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी करत वेगळी चूल मांडली होती. त्यावेळी ते आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम सुरतला व त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. तेथूनच त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही कामाख्या देवीच्या आशीर्वादाने सत्ता स्थापन करत असल्याचा दावा केला होता. विशेषतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही त्यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटी गाठून सपत्नीक कामाख्या देवीचे दर्शन घेतले.
कामाख्या देवीचे घेतले दर्शन
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत पत्रकारांशीही संवाद साधला. ते म्हणाले, मी कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो. शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर केली असून, दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल. या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमचेच सरकार येईल याविषयी कोणतीही शंका नाही.
दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर निशाणा साधला आहे. कालपासून महाराष्ट्राच्या स्वप्नामध्ये म्हशींचा हंबरडा ऐकू येत आहे. म्हशी बिचाऱ्या तडफडत आहेत. गोहत्या, गोवंश हत्या तर आहेच, पण प्राणीहत्या हा सुद्धा मनुष्यजातीला व मानवतेला कलंक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटीतून जे हंबरडे आम्हाला ऐकू येत आहेत, ते ऐकून राज्यातील जनतेचे काळी विदीर्ण झाले आहे, असे संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.