जळगाव मिरर । 1 नोव्हेंबर 2025
भुसावळ शहरातील बांधकाम व्यावसायिक हाजी मुन्ना तेली यांच्या अकाउंटंटकडून तब्बल २५ लाख ४२ हजारांची सिनेस्टाईल लूट झाल्याचा थरार २८ ऑक्टोबरला रात्री १०.२० वाजता सत्यसाई नगर परिसरात घडला होता. या प्रकरणातील तपासात पोलिसांनी अवघ्या २ दिवसांतच लुटीचा गुन्हा उघडकीस आणून ६ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २३ लाख ४२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील हाजी मुन्ना तेली यांच्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून काम करणारे मोहम्मद यासीन इस्माईल शेख हे दररोज दिवसभरातील रोकड बँकेत जमा करण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा २५ लाख ४२ हजारांची रोकड असलेली पिशवी घेवून घरी जात असताना, सत्यसाई नगराजवळ दबा धरून बसलेल्या लुटारूंनी त्यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडले आणि रोकड लंपास केली होती. तर आरोपींनी अंधाराचा फायदा घेत धूम स्टाईल पळ काढला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तेली यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, चालक शाहीद बेग यानेच पैशांची माहिती गुन्हेगारांना दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानेच आपल्या साथीदारांसह लूट करण्याचा प्लॅन आखला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) हा मुख्य सूत्रधार व चालक, मुजाहिद आसीफ मलिक (२०, रा. भुसावळ), मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (१९, रा. भुसावळ), अजहर फरीद मलक (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), अमीर खान युनूस खान (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), इंजहार बेग इरफान वेग (२३, रा. रसलपूर, ता. रावेर) यांचा समावेश आहे.
यापैकी शाहीद बेग याच्यावर मलकापूर पोलीस ठाण्यात केबल चोरीचे तर अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड करत आहेत.
कारवाई भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, गुन्हे शाखेचे पो. नि. राहुल गायकवाड, बाजारपेठचे निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, नाईक श्रीकृष्ण देशमुख, नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील तसेच इतर पथकातील अधिकाऱ्यांनी समन्वयाने करून आरोपींना बेड्या ठोकल्या



















