
जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२४
पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या अंगावरील २ लाख ६५ हजारांचे दागिणे तोतया पोलिसांनी लांबवल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगरजवळ घडली. या प्रकरणी दोघा अनोळखींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील वेडीमाता मंदीर, खळवाडी, आदर्श गल्लीतील वसंत जगन्नाथ पाटील (वय ७९) यांची दीपनगरजवळ दोघा अनोळखींनी अॅक्टीवा गाडी थांबवून पोलीस असल्याची बतावणी केली. तर आत्ताच एका म्हातारीचे दागिणे लांबवल्याने तुम्ही इतके दागिणे घालून कोठे जात आहात, असे सांगून दीपनगर बस्टॅन्डसमोरील महामार्गावर त्यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर त्यांनी अंगावरील सोने काढून ठेवा, असे सांगितले. यामुळे वसंत पाटील यांनी रुमालात दागिणे काढले, सोबत कागदपत्रे ही रूमालात ठेऊन रुमाल बांधला. त्यानंतर हा रुमाल डिक्कीत नीट ठेवतो, असे सांगून हातचलाखीने त्यांचे २ लाख ६५ हजारांचे दागिणे घेऊन भामटे पसार झालेत. या प्रकरणी वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करत आहेत.