
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६
न्यायालयीन कर्मचारी भरती प्रक्रियेदरम्यान घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन जाऊन त्याचा वापर करून प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या नितीन भोजराज राठोड या परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दि. २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने रविवारी (दि. २६ एप्रिल) लिपिक, शिपाई व वाहनचालक पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी गणेश कॉलनी येथील प. न. लुंकड कन्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर नितीन राठोड हा परीक्षा देत असताना त्याच्याकडे मोबाईल आढळून आला. परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने तत्काळ कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अति. जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजय मोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार राठोड याच्याविरुद्ध फसवणूक तसेच महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा अधिनियम २०२४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली. संशयित राठोड याने परीक्षा सुरू असताना आपल्या मोबाईलमधील गुगलचा वापर करून प्रश्नपत्रिकेतील किमान सहा प्रश्नांची उत्तरे शोधून ती उत्तरपत्रिकेत लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे उमेदवारांमध्येही खळबळ उडाली आहे.





















