जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२४
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे हैदराबाद येथे उपचार सुरु आसताना सोमवारी पहाटे तीन वाजता किम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या दोन आठवड्यापासून ते हैदराबादमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला ते डायलिसिस करीत असत. परंतू या महिन्यात पक्षाची नांदेड येथे बैठक आसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ॲम्बुलन्समधून त्यांना हैदराबाद येथे दाखल केले होते. परंतू प्रकृतीत सुधार होत असतानाच सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासदार चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभूत केले होते.