जळगाव मिरर । १८ नोव्हेंबर २०२५
कायम करण्यासाठी पंधरा लाख रुपये देवूनही कायम न करता वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्यामुळे तणावात असलेल्या महेश भास्करराव सावदेकर (वय ५२, रा. देविदास कॉलनी) यांनी विष प्राशन करीत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सततचा त्रास आणि पैसे देवूनही पुन्हा महाविद्यालयात येवू नको असे सांगून कामावरुन काढून टाकल्यामुळे सावदेकर तणावात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील देविदास कॉलनीत राहणारे महेश सावदेकर हे मू. जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. सोमवारी त्यांच्या पत्नी यशोधरा या कामावर गेल्या होत्या, तर मुलगा क्लासला गेला होता. त्यामुळे घरी एकटेच असलेल्या महेश सावदेकर यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना महेश सावदेवकर हे जमिनीवर पडलेले दिसून आले. तसेच त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांनी लागलीच घटनेची माहिती त्यांचा पत्नी आणि भाऊ अविनाश सावदेकर यांना दिली. ते तात्काळ घरी पोहचले आणि त्यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या महेश सावदेकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेश सावदेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यशोधरा यांनी संस्थेवर गंभीर आरोप केले. यावेळी त्या म्हणाल्या की, महेश सावदेकर हे अनेक वर्षांपासून मू.जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. कामाच्या ठिकाणी त्यांना कोणतेही काम करण्यास सांगत होते आणि ते करत देखील होते. त्या मोबदल्यात संस्थेकडून त्यांना जास्त पगार दाखविला जायचा व तशी सहीदेखील घेतली जात असे, मात्र हाती तोकडी रक्कम दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान या आरोपाबाबत संस्थाचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. संस्थाचालक बाहेर गावी असल्याचे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. महेश सावदेकर हे त्यांच्या पत्नीला मला कामावरुन काढून टाकले, त्यांच्या हातपाय पडलो तरी देखील कामावर घेतले नाही. यापुढे महाविद्यालयात यायचे नाही असे ते वारंवार पत्नीला सांगत होते. त्यामुळेच ते तणावात गेले आणि आत्महत्या केल्याचा आरोप सावदेकर यांच्या पत्नी यशोधरा सावदेकर यांनी केला. पतीच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यापुर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न कामावरुन काढून टाकल्यामुळे सावदेकर हे सतत कामाच्या चिंतेमुळे तणावात होते. त्यामुळे त्यांनी दि. २१ जून रोजी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु आता विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.
काम करणाऱ्या संस्थेत कायम करण्याकरीता सावदेकर यांनी पंधरा लाख रुपये दिले होते. यावेळी दिलीप रामू पाटील यांनी मध्यस्ती देखील केली होती असा आरोप सावेदकर यांच्या पत्नीने केला. तसेच संस्थेने कायम तर केले नाही, मात्र दीड महिन्यांपुर्वी त्यांना कामावरुन कामावरुन काढून टाकले. त्यानंतर देखील सावदेकर हे वारंवार महाविद्यालयात भेटण्याकरीता गेले होते, परंतु त्यांना कामावर घेण्याकरीता उडवाउडीवीची उत्तरे दिली जात होती.




















