जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२४
शहरातील मेहरुण तलाव परिसरात अल्पवयीन मुलीसोबत फिरणाऱ्या तरुणाला काही तरुणांनी मारहाण केली. यावेळी त्या तरुणाने आपल्या मित्रांना त्याठिकाणी बोलावून घेतले. दरम्यान, दोन्ही गट समोरासमोर येवून त्यांच्यामध्ये तुफान राडा झाला. ही घटना सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण तलाव परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काही दिवसांपुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतांनाच सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी पुन्हा एका तरुण पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला घेऊन मेहरुण तलाव परिसरात फीरत होता. हा प्रकार तेथील काही तरुणांच्या लक्षात आल्याने त्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारला.
यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाल्याने त्या तरुणांनी त्या मुलीसोबत असलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर संबंधित तरुणाने त्याच्या काही मित्रांना बोलावून घेतले. काही वेळातच काही तरुण त्याठिकाणी आल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार राडा झाला. घटनेची माहिती निर्भया पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. दरम्यान, मेहरुण तलाव परिसरात फीरणाऱ्या त्या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीच्या काकांना बोलविले व तिला समज देऊन काकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या तरुणांनाही समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले