
जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतच छत्रपती संभाजी नगर उस्मानपुरा परिसरातील कॉलेजमध्ये कॉलर उडवल्याच्या रागातून एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये शिरून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप विश्वनाथ निपटे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उस्मानपुरा भागातील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होता. तो त्याच परिसरात असणाऱ्या भाजीवाली बाईच्या पुतळ्यालगत असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होता. त्याच्यासोबत त्याचा मावसभाऊ व इतर 3 मित्रही राहत होते. मंगळवारी सायंकाळी सर्वजण महाविद्यालयातून घरी परतले. त्यानंतर त्याचा मावसभाऊ व इतर मित्र बाहेर फिरण्यासाठी गेले. यावेळी प्रदीप एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री 10 च्या सुमारास त्याचा भाऊ व मित्र घरी परतले असता त्यांना प्रदीप गळा चिरलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता.
त्याची माहिती त्यांनी घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उस्मानपुरा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास शोध सुरू केला. त्यांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, प्रदीपच्या हत्येपूर्वी 3 दिवस अगोदर त्याचा कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. तू एकटक का पाहतो, कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून हा वाद झाला होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांत हाणामारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या वादातून हत्येची ही घटना घडली असावी असा संशय आहे. ऐन संक्रातीच्या दिवशी विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ माजली आहे.