जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
गेल्या आठवड्यात राज्यात भाजपचे दिग्गज नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती शिर्डी येथे पदाधिकारी यांचा मेळावा झाला होता. यावेळी अमित शहा यांनी शरद पवारांचा जोरदार घणाघात केला तर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी देखील अमित शहा यांचा जुना इतिहास बाहेर काढल्याने आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी ट्विट करीत शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले की, अमित शहा यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही. देशात आजपर्यंत अनेक गृहमंत्री झाले ज्यांनी पदाची प्रतिष्ठा वाढवली, असे ते देशभक्त होते. आपण तडीपार असा गृहमंत्री पाहिलेला नाही असा टोला त्यांनी शहांना लगावला. गुजरातमध्येही अनेक प्रशासक होऊन गेले. या सगळ्या प्रशासकांचे वैशिष्ट्य होते, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नव्हते.
भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले की, ्रदाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा.पवार साहेब विसरले आहेत.