जळगाव मिरर | २१ मार्च २०२५
जळगाव जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिंदे सेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या खुनाची घटनेला २४ तास उलटत नाही तोच भुसावळ शहरातून तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असणाऱ्या तरूणाला क्रूर हत्या करून गाडून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील टेक्नीकल हायस्कूल मागील रहिवासी मुकेश प्रकाश भालेराव ( वय 31) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द देखील केले होते. यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळ येथेच वास्तव्याला होता. सुमारे चार दिवसांपूव मुकेश भालेराव याला घरून काही तरूण घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेऊन देखील तो मिळून न आल्यामुळे आज सकाळी त्याची पत्नी पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आली. दरम्यान, आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुकेश प्रकाश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह हा तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुकेश भालेराव याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले होते. शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुकेश भालेरावच्या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या कृत्यामागे पुर्व वैमनस्य असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.