जळगाव मिरर / ३ मार्च २०२३
जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात बेकायदेशीर कृत्यासह वाळुच्या चोरीत असलेला गुन्हेगार पंकज दीपक मोरे (24, यशवंत नगर, भडगाव) यास पाचोरा प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी जळगाव, धुळे व नाशिक या जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
2020 पासून पंकज मोरे बेकायदेशीर कृत्यात तसेच बेकायदेशीर वाळू चोरीच्या गुन्हेगारीत सामील आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी मंडळ अधिकारी विजय भानुदास येवले व त्यांचे सहकारी हे भडगाव-पाचोरा रोडवर शासकीय आयटीआय जवळ अवैध गौणखनिज कारवाई कामी हजर असतांना विना नंबरचे ट्रॉली व व ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी करतांना आढळल्याने पंकज दीपक मोरे याने मंडळ अधिकारी विजय येवले यांना धक्काबुक्की केली व सोबत असलेले तलाठी योगेश ब्राह्मणे, मंडळ अधिकारी एन. जी. बागड यांना दमदाटी करून ट्रॅक्टरमधील गौण खनिज (वाळू) खाली करून ट्रॉलीसह पळ काढला होता व शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. याबाबत पाचोरा पोलिसात पंकज मोरेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.