जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून आपल्या पत्नी व मुलाला भरवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चांगलाच व्हायरल झाला असून ठाकरे गटाने त्यांच्या या कृतीवर आक्षेप घेत त्यांचा उल्लेख मस्तवाल आमदार म्हणून केला आहे. ज्या राज्यात स्वतः गृहमंत्रीच ठोकून काढण्याची भाषा करतात, त्या राज्यात आमदाराने हा माज दाखवणे स्वाभाविकच आहे, असे ठाकरे गटाने या प्रकरणी म्हटले आहे.
आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल याचा काल वाढदिवस साजरा झाला. आमदार संजय गायकवाड यांनी त्याचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा केला. त्यांनी एका भव्य समारंभात कुणालच्या वाढदिवसाचा केक कापला. यासाठी त्यांनी एका मोठ्या तलवारीचा वापर केला. तलवारीने केक कापून तो त्यांनी आपल्या लाडक्या मुलासह पत्नीला भरवला. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पण आता त्यांच्या या कृतीवर टीकेची झोड उठली आहे.
सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापला तर त्याच्यावर कारवाई केली जाते. पण आता थेट लोकप्रतिनिधीचे अशी चूक केल्यामुळे पोलिस आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या या सहकाऱ्याला समज देणार की त्याची चूक पाठिशी घालणार? असे विविध सवाल या प्रकरणी सर्वसामान्यांतून उपस्थित केले जात आहेत.
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी गायकवाड यांचा उल्लेख मस्तवाल आमदार म्हणून केला आहे. ज्या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे आमदार रोज पोलिसांना नव्या नव्या धमक्या देतात… ज्या राज्यात स्वतः गृहमंत्रीच ठोकून काढण्याची भाषा करतात… ज्या राज्यात मुख्यमंत्रीच दंगलीस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी मी ठामपणे उभे राहतात… त्या राज्यात आमदाराने हा माज दाखवणे स्वाभाविक आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.