जळगाव मिरर । १९ ऑक्टोबर २०२५
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेल्या ६३ मोबाईलचा वेगवेगळ्या राज्यातून सायबर पोलिसांनी शोध लावीत हस्तगत केले. शोधलेले मोबाईल शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले.
जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणांसह आठवडे बाजारांमधून नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली होती. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक गणेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों किरण वानखेडे, हेमंत महाडीक, पोलिस नाईक सचिन सोनवणे, पोकों पंकज वराडे, गौरव पाटील, मिलिंद जाधव, दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबविली.यामध्ये वेगवेगळ्या राज्यातून १४ लाख ५० हजार रुपयांचे हे ६३ मोबाईल हस्तगत केले. या संदर्भात मूळ मोबाईल मालकांना माहिती देण्यात आली व शनिवारी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याहस्ते मोबाईल त्यांना देण्यात आले.
गहाळ झालेल्या मोबाईल यांचे आयएमईआय क्रमांकासह संपुर्ण माहिती पोलिसांच्या सोशल मीडियावर अपलोड केली आहे. तरी नागरिकांनी सीईआयआर पोर्टलवर गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केले आहे.