जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असतांना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरात अखेर फूट पडली आहे. आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम – हलगेकर यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात अजित पवार आणि वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्यावरही निशाणा साधला.
मी शांत आहे ते बरे आहे, नाहीतर माझ्याकडे दहा हात आहेत. मी शेरनी आहे. तुमच्याकडे दुधारी तलवार असल्याचे तुम्ही म्हणत असाल तर मी देखील दुर्गा आणि चंडीचा अवतार असल्याचा इशारा भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांचा दिला आहे. मला आक्रमक होण्याची संधी देऊ नका, आगामी काळात मैदानही आमचेच असेल आणि तिथे चौकार, षटकार देखील आम्हीच लगावणार असल्याचे भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे. वडील धर्मरावबाबा आत्राम यांना देखील भाग्यश्री आत्राम यांनी चांगलेच सुनावले. वडिलांचा विरोध असताना देखील त्याला जुमानता भाग्यश्री आत्राम यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करत असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या. मात्र, त्याला धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोध केला होता. मी घर फोडून बाहेर पडले नाही तर घर फोडून अजित पवार बाहेर पडले असल्याचे भाग्यश्री यांनी म्हटले आहे. आधी अजित पवार यांनी ते कबूल करावे, अशा शब्दात भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय हा माझा आहे. शरद पवारांनी आमचे घर फोडलेले नाही. मी पक्षप्रवेशासाठी तीन वेळा त्यांची भेट घेतली असल्याचे देखील भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.
