जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोड प्रकरणावरून राज्यभरात वातावरण तापले असून या प्रकरणाचा विस्तार आता राजकीय पातळीवर पोहोचला आहे. शहरातील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी जवळपास साडेबाराशे झाडे तोडण्यात आल्याचे नाशिक महापालिकेने जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमींसह विविध सामाजिक संस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरात आधीच तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीवरून विरोध तीव्र होत असताना, महापालिकेच्या नव्या खुलास्याने चर्चा अधिक चिघळली आहे.
अंजली दमानिया यांनी आपल्या विधानाने सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांना थेट लक्ष्य केले असून राज्यभरातून विरोध होत असूनही, नाशिकमधील झाडे तोडण्याची गिरीश महाजन यांना इतकी मस्ती आली आहे की लोकांनी आंदोलन केलं, तरी काही फरक पडत नाही, असे दमानिया यांनी कठोर शब्दात म्हटले. त्यांनी नागरिकांना आवाहन करत अशा वृत्तीनं वागणाऱ्या नेत्यांना राजकारणातून बाहेर फेका, अशी हाक दिली. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पर्यावरणीय प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले जात आहे. नाशिकच्या नागरिकांमध्येही या प्रकरणाबद्दल असंतोष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
दरम्यान, महापालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी एकूण 1,728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यातील 458 झाडे वाचविण्यात महापालिकेला यश आले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उर्वरित 270 झाडांची तोड करण्यात आली असून, या बदल्यात मनपाच्या मलनिस्सारण विभागाने 1 कोटी 76 लाख रुपयांचा पर्यावरणीय भरपाई निधी जमा केला आहे. हा निधी पुढील पर्यावरण संवर्धन प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल, असे मनपाने स्पष्ट केले. तसेच फाशीच्या डोंगर परिसरात 17,680 झाडांची नव्याने लागवड केल्याचेही सांगण्यात आले असून, या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
याशिवाय तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे सुमारे 1,800 झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याची घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतातील राजमुद्री येथे जाऊन विशेष झाडांची निवड केली होती. त्यानुसार जवळपास 15 फूट उंचीची 15 हजार देशी प्रजातींची झाडे ज्यात वड, पिंपळ, निंब, जांभूळ आणि आंबा यांसारख्या प्रजातींतील झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली आहेत. पहिला ट्रक नुकताच शहरात दाखल झाला असून या झाडांच्या देखभालीसाठी ठिबक सिंचन प्रणालीपासून ते जैविक खतांपर्यंत विस्तृत व्यवस्था करण्यात आल्याचे उद्यान विभागाने सांगितले.
सोमवारपासून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीच्या या विशेष मोहिमेला औपचारिक सुरुवात होत आहे. तथापि, एका बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि दुसऱ्या बाजूला झाडांची लागवड, या दोन्ही गोष्टींनी शहरात द्वंद्व निर्माण झाले आहे. पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे की लागवड महत्त्वाची असली तरी प्रौढ झाडांची तोड पर्यावरणीय दृष्टीने मोठा तोटा आहे. दमानिया यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे हा विषय अधिक तीव्र झाला असून पुढील काही दिवसांत या वादाचा राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर आणखी विस्तार होण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या हरित वारशासमोर उभ्या राहिलेल्या या प्रश्नाला नागरिक, कार्यकर्ते आणि सरकार यांच्यातील संघर्षाची नवी दिशा लाभण्याची शक्यता आहे.





















