जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता राज्यातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या मादक अदांनी आणि स्टेजवरील परफॉर्मन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे डान्स व्हिडीओ, अल्बम्स आणि थेट कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण यावेळी गौतमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एक भीषण अपघात घडला असून, पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ तिच्या गाडीने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास वडगाव पुलाजवळील एका हॉटेलसमोर रिक्षा उभी होती. त्या रिक्षामध्ये चालकासोबत दोन प्रवासी बसलेले होते. अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्या उभ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, रिक्षेचे अक्षरशः चक्काचूर झाले. अपघातानंतर रिक्षामधील प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले. घटनास्थळी तात्काळ नागरिक जमा झाले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या अपघाताची नोंद मिळताच सिंहगड रोड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशीदरम्यान ही गाडी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीची असल्याची माहिती मिळवली. अपघाताच्या वेळी मात्र गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. तिचा ड्रायव्हर ही कार चालवत होता, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. घटनेनंतर ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. कार घटनास्थळीच आढळून आली असल्याने पोलिसांचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर येताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली असून काहींनी यावरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गौतमीच्या चाहत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्पष्ट झालं की, अपघाताच्या वेळी गौतमी स्वतः कारमध्ये नव्हती. तिच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तरीसुद्धा जखमी प्रवाशांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले आहे. भरधाव गाड्या, बेदरकार वाहनचालक आणि निष्काळजीपणामुळे वारंवार अपघात घडत आहेत. अपघातानंतर कार आणि रिक्षेच्या अवस्थेवरून धडकेची भीषणता लक्षात येते. नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की, महामार्गावर कडक वेगमर्यादा अंमलात आणावी आणि ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. सध्या सिंहगड रोड पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, पुढील कारवाईसाठी जखमींचे जबाब व घटनास्थळाचे पंचनामे केले जात आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेची गंभीरता अधोरेखित झाली आहे.