जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२४
खळ्यात झोपलेल्या विठ्ठल आनंदा पाटील (वय ४८, रा. पिचर्डे, ता. भडगाव) या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून केला. ही घटना पिचर्डे गावात सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित अभिमान आनंदा पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात विठ्ठल पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचा मोठा भाऊ अभिमन हा शेतजमिनीचा हिस्सास पाळट करून द्या असे विठ्ठल आनंदा पाटील यांना वारंवार सांगत होते. दरम्यान, विठ्ठल पाटील हे त्यांची वडीलोपार्जीत असलेली जमिनी प्रत्येकाच्या नावावर करुन द्या असे त्यांना सांगत असल्याने अभिमान पाटील यांना त्याचा राग होता. तसेच खळ्यात बकऱ्यांसाठी असलेल्या जागेवर तारजाळी बांधण्यास देखील त्यांचा विरोध करीत होते. दरम्यान, विठ्ठल पाटील हे त्यांच्या गावाबाहेर असलेल्या खळ्यात झोपलेले असतांना त्यांचा मोठा भाऊ अभिमान पाटील याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यांचा खून केला. घटनेची माहीती मिळताच चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह देशमुख पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, एपीआय. चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ. अनिल अहिरे, पोहकॉ. मुकुंद पाटील, पोकॉ. महेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत अभिमन आनंदा पाटील रा. पिचर्डे ता. भडगाव यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्यानंतर सायंकाळी पिचर्डे गावात मयत विठ्ठल पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.