जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२३
राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटात दसरा मेळाव्याच्या सभेवरून गेल्या पाच दिवसापासून राजकारण सुरु असतांना आता शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्याचे ठिकाण ठरल्याने ठाकरे गटाची सभा शिवाजी पार्कवरच होणार आहे.
दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिंदे गटाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहे.
या बैठकीमध्ये शिंदे गटानं दसरा मेळावा घेण्यासाठी दोन मैदानाची निवड केली होती. या पार्श्वभूमीवर मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी देखील ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. या मेळाव्यामध्ये बोलत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. तर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. त्यानंतर यंदा देखील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने येताना दिसणार आहे. यावर्षी दोन्ही गटांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होईल? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.