जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२६
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक परिसरातील दुवामहल मागील परिसरातील रहिवासी रिझवाना इम्रान खाटीक (वय ३७) यांचा डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना १३ ऑगस्टला रात्री १०.३५ वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे खडकी बु. सबस्टेशन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिझवाना खाटीक यांना गेल्या काही दिवसांपासून ताप, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, अशक्तपणा तसेच उलट्यांचा त्रास सुरु होता. त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारापूर्वी केलेल्या वैद्यकीय तपासणीत डेंग्यू एनएस-१ अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना इगतपुरी येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे उपचारार्थ दाखल केले होते. रुग्णालयाच्या नोंदीनुसार दाखल होताना त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी होता. प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांना ऑक्सिजन व श्वसन सहाय्य, व्हेंटिलेटर तसेच जीवनरक्षक औषधोपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावतच गेली. हृदयाची गती थांबल्यानंतर डॉक्टरांनी सीपीआरसह आवश्यक जीवनरक्षक उपचार केलेत. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी रात्री १०.३५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. रिझवाना खाटीक यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्या मन्नान खाटीक व गफ्फार खाटीक यांच्या बहिण, तर अब्दुल कादिर यांच्या मातोश्री होत. डेंग्यूचा बळी गेल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली असून, परिसरात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खडकी बु. सबस्टेशन परिसरात पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. गीता जाजू यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे वा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनात १४ ऑगस्टला तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत हिरापूर उपकेंद्राच्या सबस्टेशन परिसरात कंटेनर सर्वेक्षण व अबेटिंगची मोहीम राबवण्यात आली. या कार्यवाहीत वैद्यकीय अधिकारी डॉ. गीता जाजू, आरोग्य पर्यवेक्षक किरणा बेलदार, आरोग्य निरीक्षक पी. पी. महेर, सीमा सावकारे, आरोग्य सेविका एस. व्ही. मोरे, आरोग्य सेवक एन. डी. सूर्यवंशी, विजया दाभाडे, अक्षय कराड, विनोद नील तसेच आशा सेविकांनी सहभाग घेतला.




















