जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अनेक सरकारी कार्यालयात लाच घेतल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच चाळीसगाव शहरात देखील मन्याड प्रकल्पातील गाळ वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात 13 हजार 300 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चाळीसगाव पाटबंधारे विभागातील दप्तर लिपिक तुषार अशोक पाटील (36) यास धुळे एसीबीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता अटक केली. या कारवाईने सरकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील 23 वर्षीय तक्रारदार यांचा ट्रक्टर व शेतीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांना त्यांच्या आजोबांच्या शेतीमध्ये गाळ टाकण्यासाठी मन्याड धरण प्रकल्पातून गाळ वाहतुकीची परवानगी हवी असल्याने आरोपी तुषार पाटील यांनी 30 सप्टेंबर 2023 रोजी 13 हजार 300 रुपये लाच मागितली होती.
तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला मात्र लाच सापळ्याचा संशय आल्याने आरोपी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी अहवाल आल्यानंतर संशयिताला शुक्रवारी सकाळी 11 वाजता अटक करण्यात आली. संशयिताविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 सह भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम 2018 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक हेमंत विजय बेंडाळे, राजन कदम, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.