जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व धर्मदाय आयुक्त श्री. राहुल चव्हाण यांच्या देखरेखीखाली मुंबईतील वरळी येथे अत्यंत पारदर्शक, शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर नियमांनुसार पार पडल्याने बॉक्सिंग वर्तुळात पारदर्शकतेबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत आमदार प्रविण दरेकर यांनी तब्बल ४३ मतांनी विजयी होत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्षपद पटकावले. त्यांच्या नेतृत्वावर राज्यभरातून व्यक्त झालेला विश्वास लक्षणीय ठरला. याच निवडणुकीत धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनीही ४३ मतांनी दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपद पटकावले. त्यांच्या विजयानं धुळे जिल्ह्याचा मान उंचावला असून त्यांच्या नेतृत्वगुणांची पुन्हा एकदा प्रभावी नोंद झाली आहे.
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे हे नाशिक विभागीय सचिवपदी बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या शांत, समन्वयक, नियोजनबद्ध कामकाजामुळे विभागात समाधानाची भावना निर्माण झाली आहे. या निवडणुकीत प्रामाणिकपणा, कष्ट, निष्ठा आणि स्वच्छ कारभाराची मूल्यं ठळकपणे उमटली. चुरशीची स्पर्धा असूनही अखेरीस संघटनात्मक एकता आणि प्रामाणिक नेतृत्वाचा विजय झाला. राज्यभरातील प्रतिनिधींनी आ. जय कवळी यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास दाखवला असून महाराष्ट्रातील बॉक्सिंग नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. या भव्य विजयानंतर धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे डॉ. तुषार रंधे आणि मयूर बोरसे यांचा अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, उपाध्यक्ष कैलास जैन, खजिनदार राजेंद्र बोरसे, सामाजिक कार्यकर्ते संजय गुजर, भास्कर बोरसे, एल.के. प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील, मधुर फूड पार्कचे संचालक हर्षवर्धन रंधे, डिगंबर बोरसे, विजेंद्र जाधव, सागर कोळी, नूर तेली, धीरज पाटील, भरत कोळी, ऋषिकेश अहिरे, सुदर्शन गोसावी, भूषण पवार, दर्शन कोळी, हर्षवर्धन वाघ, नयन सोनवणे, ओम राजपूत, रोहित कोळी, प्राजक्ता शिंदे, राज्य व राष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने दोन्ही विजयी पदाधिकाऱ्यांना भव्य सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.




















