पहिल्याच दिवशी ७००हून अधिक अर्ज; नाराज कार्यकर्त्यांची स्वबळावर तयारी
जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२५
जळगाव महापालिका निवडणुकीची लगबग जोरात सुरू झाली असून नामनिर्देशन अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी ७०० पेक्षा अधिक अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेऊन गेल्याने निवडणूक वातावरण तापले आहे. एकीकडे महायुती व महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसताना दुसरीकडे शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख पक्षीय कार्यकर्ते यंदाच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत उतरले आहेत.
सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका अनेक इच्छुकांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी रणनीती आखली जात असून, यामुळे अनेक प्रस्थापित उमेदवारांना निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराज इच्छुक उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यास मतांची विभागणी होऊन निवडणूक गणिते बदलू शकतात. त्यामुळे यंदाची जळगाव मनपा निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. पहिल्याच दिवशी झालेली मोठ्या प्रमाणातील अर्जविक्री आणि अपक्ष उमेदवारांची वाढती हालचाल पाहता, येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.




















