जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
राज्यातील हौशी नाट्य कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणा-या ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे व मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन, श्रीफळ वाढवून व नाट्यपरंपरेप्रमाणे घंटानाद करत झाले.
उदघाटन सोहळ्याप्रसंगी रंगमंचावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासमवेत चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ, हास्यजत्रा फेम रंगकर्मी हेमंत पाटील, तसेच झी५ वरील बाई तुझ्या पायी या वेबसिरीजमध्ये अभिनय करणारे जळगावचे रंगकर्मी अनिल मोरे, चेतन कुमावत यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक व समन्वयक प्रा.संदीप तायडे आदी उपस्थित होते. नटराज पूजन, श्रीफळ वाढवल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घंटानाद करुन नाट्य स्पर्धेचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी शहरातील रंगकर्मींचे कौतुक करण्यासह शहरातील जैन उद्योग समूहाचेही आभार मानले. या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले तर आभार सहसमन्वयक नितीन तायडे यांनी मानले.
पहिल्या दिवशी रंगले दानव
पहिल्या दिवशी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांनी मानवी स्वभावातील दृष्ट प्रवृत्ती, गूढता आणि संघर्षाचा शोध घेणारे गुढ नाटक दानव ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाले. अतुल साळवे लिखीत व प्रवीण मोरे दिग्दर्शित या नाटकाने येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात शुभारंभ झाला. राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नाटकाचा गूढ प्रवास रंगवत स्पर्धेची सुरुवात केली.
भयावह जंगलातील मोडकळीस आलेल्या घरात अडकलेल्या दोन प्रवाशांवर आधारलेली ही कहाणी मानवी स्वभावातील दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिबिंब दाखवत हळूहळू गुढ उलगडत जाते. मुख्य पात्र चांडाली आणि भैरव यांच्यातून मानवी दुहतेचा आणि सत्याचा संघर्ष या नाटकाने उभा राहतो. गूढ घटनांच्या मालिकेनंतर अखेरीस चांडाली पोलीस अधिकारी असल्याचा धक्कादायक खुलासा प्रेक्षकांना विचारमग्न करणारा होता.
तांत्रिक बाजूत प्रकाशयोजनाकार अतुल ब-हाटे यांनी गुढतेचे वातावरण सजीव केले. पार्श्वसंगीतकार मोहित कांबळे यांनी प्रसंगांला भेदक परिणामकारता देण्याचा प्रयत्न केला. नेपथ्यकार रोशन वाघ उभे केलेले नेपथ्य नाटकाचा गाभा होता. गूढतेच्या माध्यमातून मानवी स्वभावाचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न केलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना रंगवले. नाट्य रंगण्यासाठी पूरक रंगभूषा व वेशभूषा काजल वाघ व ज्योती चंद्रमोरे यांनी केली होती. दानव नाट्यात दीपनगर येथील प्रविण मोरे (भैरव), शनाया (ऐश्वर्या खोसे), चांडाली (शुभम गुडा), आत्मा (सपना तिवारी), पाशा (रोशन वाघ), अथर्व (महेश होनमाने) यांनी अभिनय साकारला होता. तांत्रिक बाजूंनी खुललेल्या गुढ नाट्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.





















