जळगाव मिरर | ११ नोव्हेबर २०२३ | जिल्ह्यातील सामाजिक विशेष साहाय्य या राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थीची दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४ लाभार्थीच्या निवृत्तीवेतनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १३२ कोटी २३ लाख १६ हजार १९० रुपयांचे अनुदानाचे तालुक्यांना वितरित केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जातीच्या १२००८ लाभार्थीना ५ कोटी २० लाख ८५ हजार १०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील ६९१९२ लाभार्थीना ३० कोटी २४ लाख २४ हजार १०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या ९०१५ लाभार्थीना ४ कोटी १ लाख ७२ हजार ७०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या १९६५२ लाभार्थीना ७ कोटी ६९ लाख १४ हजार ९०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील १५३८२० लाभार्थीना ७८ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या १६५९९ लाभार्थीना ६ कोटी ११ लाख ४८ हजार ६०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.