जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व धर्मदाय आयुक्त श्री. राहुल चव्हाण यांच्या देखरेखीखाली मुंबईतील वरळी येथे अत्यंत पारदर्शक, शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर नियमांनुसार पार पडल्याने बॉक्सिंग वर्तुळात समाधानकारक वातावरण निर्माण झाले.
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर आणि डॉ. तुषार रंधे यांनी तब्बल ४३ मतांच्या स्पष्ट आघाडीने विजयाची मुहर उमटवली. संघटनेच्या नेतृत्वाची धुरा आता दरेकर यांच्याकडे अध्यक्ष म्हणून तर रंधे यांच्या हाती उपाध्यक्ष म्हणून सोपवली जाणे ही राज्यातील बॉक्सिंग क्षेत्रासाठी सकारात्मक दिशा दर्शवणारी बाब मानली जात आहे. त्यांच्या संघटन कौशल्यावर आणि कार्यक्षम नेतृत्वावर राज्यभरातील पदाधिकारी व क्रीडाप्रेमी यांचा व्यक्त झालेला विश्वास निश्चितच उल्लेखनीय आहे.
याच निवडणुकीत मयूर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिवपदी बिनविरोध निवड होणे ही नाशिक विभागासाठी मोठी ताकद ठरली आहे. संघटनेच्या ग्रामीण ते शहरी पातळीवरील कामकाजात नव्या जोमाची आणि शिस्तबद्धतेची अपेक्षा या निवडीमुळे निर्माण झाली आहे.
ग्रामीण प्रतिभेला चालना — आधुनिक बॉक्सिंग सेंटर उभारणी
— अध्यक्ष प्रवीण दरेकर
अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले की आगामी काळात ग्रामीण भागातील सुप्त लढाऊ गुणवत्तेला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. सुविधा व संधीअभावी मागे राहिलेल्या ग्रामीण खेळाडूंकरिता रिजनल टॅलेंट सर्च प्रोग्राम राबवून प्रत्येक गावातून गुणवत्ता शोधली जाईल.
याचबरोबर राज्यभर आधुनिक सुविधा असलेली “ॲडव्हान्स बॉक्सिंग ट्रेनिंग सेंटर’’ उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तराचे रिंग, तांत्रिक प्रशिक्षण, स्पोर्ट्स सायन्स, फिजिओथेरपी व आहार मार्गदर्शन यांच्या आधारे ग्रामीण खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे.
अध्यक्ष प्रवीण दरेकर म्हणाले,
“ग्रामीण युवकांमध्ये अपार क्षमता आहे; त्यांना योग्य दिशा व सुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे. राज्यातून आणखी राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय विजेते घडवणे हे आमचे ध्येय आहे.”
ग्रामीण भागात भव्य राज्य बॉक्सिंग स्पर्धा घेणार; खेळाचा प्रचार–प्रसार वाढवणार
— उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी ग्रामीण खेळाडूंसाठी मोठी घोषणा करताना सांगितले—
* ग्रामीण भागातच भव्य राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धांचे आयोजन केले जाईल.
* प्रत्येक जिल्ह्यात खेळाचा प्रचार–प्रसार, मूलभूत सुविधा, प्रशिक्षक प्रशिक्षण आणि खेळाडू विकासावर विशेष भर दिला जाईल.
* नवोदित खेळाडूंसाठी ओपन सेलेक्शन कॅम्प व टॅलेंट सर्च उपक्रम राबवले जातील.
डॉ. तुषार रंधे म्हणाले,
“ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने दमदार खेळाडू पुढे येतात. त्यांना योग्य व्यासपीठ देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे.”
व्यंकटेश क्रीडा महोत्सव — उत्तर महाराष्ट्राचा “मिनी ऑलिम्पिक” निर्माण करणारे नेतृत्व
— दूरदर्शी नेतृत्व : डॉ. तुषार रंधे
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे हे गेली १४ वर्षे धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, तसेच किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे.
किसान विद्या प्रसारक संस्थेअंतर्गत स्थापन झालेले छत्रपती पुरस्कार विजेते दादासो विश्वासराव रंधे क्रीडा संकुल, शिरपूर, हे आज उत्तर महाराष्ट्रातील उगवत्या खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे.
इथे गेली ४ दशके अखंडपणे आयोजित होणारा व्यंकटेश क्रीडा महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा सोहळा असून, त्याला “मिनी ऑलिम्पिक” म्हणून ओळख प्राप्त झाली आहे.
या भव्य महोत्सवाचे प्रमाण —
२,००० पेक्षा अधिक कर्मचारी आयोजनात सहभागी
५,००० हून अधिक खेळाडूंचा सहभाग
कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह इंडोर क्रीडा प्रकार
रेल्वे, पोलीस, आर्मी, SRP संघांचा नियमित सहभाग
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची मोठी संधी
विशेष म्हणजे मागील १२ वर्षांत बॉक्सिंग खेळाला मिळालेली दिशा, व्यासपीठ आणि प्रोत्साहन ही डॉ. रंधे यांच्या नेतृत्वाची मोठी उपलब्धी मानली जाते. ग्रामीण भागात राज्य–राष्ट्रीय दर्जाचे सामने घेऊन त्यांनी असंख्य खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला.
ग्रामीण भागातील सुप्त लढाऊ गुणवत्ता शोधणार
— नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे
नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील नैसर्गिक शक्ती, जिद्द आणि लढाऊ वृत्ती यांना आधुनिक प्रशिक्षणाची जोड देऊन नवे बॉक्सर तयार केले जातील.
* गावागावात कौशल्यवर्धन शिबिरे आणि निवड प्रक्रियेचे आयोजन
* प्रशिक्षण, मूल्यमापन आणि संधी देण्यावर भर
* प्रत्येक गावातून गुणवत्ता शोधण्याचा संकल्प
मयूर बोरसे म्हणाले,
“प्रत्येक गावात एक तरी प्रतिभा दडलेली असते; आम्ही तिला योग्य व्यासपीठ देणार आहोत.”
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, संचालक राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, विश्वाई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शशांक रंधे, तसेच धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष कैलास जैन, खजिनदार राजेंद्र बोरसे, सहसचिव एल. के. प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील, विजेंद्र जाधव, सागर कोळी, नूर तेली, धीरज पाटील, भरत कोळी, ऋषिकेश अहिरे, अमोल शिरसाठ, मनोज चौधरी, भूषण पवार यांच्यासह अनेक राज्य–राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय खेळाडू, संघटक, क्रीडाप्रेमी व पालकवर्ग यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीकडून राज्यातील बॉक्सिंग क्रीडेला नवे बळ, नवा वेग आणि नवी दिशा मिळेल, असा एकमताने विश्वास व्यक्त करण्यात आला.




















