
जळगाव मिरर । २६ सप्टेंबर २०२५
जळगाव तालुक्यातील दापोरा गावात गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असताना विजेचा धक्का लागून ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयूर किशोर काळे (वय ३०, रा. दापोरा, ता. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मयूर हा शेतीची कामे करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो आपल्या आई, वडील, भाऊ, पत्नी आणि एका मुलीसोबत वास्तव्याला होता. गुरुवारी सकाळी १० वाजता मयूर हा बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला. शेजारील तरुणांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयूरला मृत घोषित केले. हे ऐकून त्याचे वडील आणि भावाने मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तरुण कर्त्या मुलाच्या अचानक जाण्यामुळे काळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.




















