जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६
चोपडा तालुक्यातील देवगाव येथील एका व्यक्तीस जिवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय ३३, रा. पनगाव ता. चोपडा, ह. मु. देवगाव ता. चोपडा) यास न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अडावद पोलीस ठाणे गु.र.नं. १४९/२०२१, सेशन केस क्र. १३/२०२२ अंतर्गत हा खटला चालविण्यात आला. हा गुन्हा १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी सुमारे ७वाजता देवगाव येथील प्लॉट परिसरात फिर्यादी भावना रवींद्र पाटील यांच्या घरासमोर घडला होता. फिर्यादीचे पती रवींद्र विश्राम पाटील हे दारूच्या नशेत असताना घरासमोर शिवीगाळ करत होते. त्यावेळी आरोपी चंद्रशेखर सपकाळे याने “मला का शिवीगाळ करतोस?” असा जाब विचारत वाद घातला. रागाच्या भरात आरोपीने रवींद्र पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले व जवळील बैलगाडीचे लाकडी शिंगाडे काढून पोटावर व पाठीवर वार केले. जखमी अवस्थेत रवींद्र पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र १६ ऑक्टोबर २०२१ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३०२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याचे कामकाज मा. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे अॅड. किशोर आर. बागुल मंगरूळकर यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, मयताचे वडील व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
डॉ. निलेश देवराज यांनी सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार झालेल्या मारहाणीतील जखमांमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सरकारी पक्षाच्या प्रभावी युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३०४ (२) अंतर्गत दोषी धरून १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश भोई (अडावद पो.स्टे.), पैरवी अधिकारी पीएसआय उदयसिंग सांळुके (पारोळा), पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पो.कॉ. राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर) व पो.कॉ. भरत इशी (मारवड) यांनी सहकार्य केले.





















