जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२५
अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील विनोद सुरेश पाटील हे उत्कृष्ट कबड्डी खेळाडू. अनेक ठिकाणी स्पधांना त्यांचे येणे, जाणे होते. यातच त्यांची कारले येथील पूनम यांच्याशी ओळख झाली. दोघेही राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू असल्याने दोघांचे विचारांचे सुत जुळले. त्यानंतर मैत्री झाली अन् मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तर सन २०१७ मध्ये दोघांनी जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका, वचन घेत दोघेही विवाहाच्या बंधनात रुपांतरीत झाले.
विनोद पाटील हे शेती करूनही त्यांचा संसार सुखाने चालू होता. दरम्यान, पूनम विनोद पाटील (वय २७) या सायंकाळी नळाला पाणी आले म्हणून वीज पंप लावून पाणी भरत होत्या. तर त्यांचे पती विनोद सुरेश पाटील हे घरातील माठात पाणी भरत होते. अचानक काही तरी पडल्याचा आवाज आला म्हणून पती विनोद पाटील पळतच बाहेर आले. तेव्हा त्यांना त्यांची पत्नी पूनम खाली बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. तसेच त्यांच्या हातात विजेची पिन होती.
त्यानंतर त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. तर लग्नाच्या ८ वर्षांनी दोघांचा डाव अर्ध्यावरती मोडला गेला. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या प्रेम सप्ताहातील ‘वचन दिवशी’ प्रेमी युगुलाच्या वचनांचा भंग झाला. नियतीने पूनमला विनोदपासून हिरावून नेले. या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर विनोद पाटील यांच्या माहितीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करत आहेत.