जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२५
भुसावळ शहरातील डी. एस. हायस्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षक व नारायण नगरातील रहिवासी रोहिदास धना सोनवणे (आर.डी सोनवणे, वय ५८) यांनी शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पूलाच्या कठड्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोटाच्या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तापी पुलावर दुचाकी लावत मारली उडी – शनिवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आर.डी. सोनवणे यांनी तापी पूलावर मोटरसायकल (एम.एच.१९ डी. टी. ३२४४) लावली व क्षणार्धात पुलाच्या कठड्यावर पाय टाकून तापी नदीत उडी मारली. सोनवणे यांनी नदीत उडी घेताच खडकावर ते पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर बसल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. हा प्रकार पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना कळताच शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली.
सोनवणे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन डॉ. आशीफ यांनी केले. सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अनेक शिक्षकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आर.डी. सोनवणे यांचा अत्यंत मनमिळावू स्वभाव होता. कोळी समाजाचे ते सक्रिय पदाधिकारी होते. सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग घेत होते. त्यांना संगीत क्षेत्राची गोडी असल्याने ते सतत गाणे ऐकत असत. त्यांनी गेल्या चार वर्षापूर्वी स्वेच्छानिवत्ती घेतली होती.
शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिल सुरवाडे, भूषण चौधरी यांनी घटनास्थळ गाठत अन्य लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आहे, पत्नी यावल तालुक्यातील आमोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे तर मुलीने वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.आर.डी. सोनवणे यांच्यावर त्याच्या मुळगावी बामणोदला संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.