जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२५
राज्यातील एकनाथ शिंदेंची शिवसेना व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल चढविला आहे.
एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात. बाळासाहेब ठाकरे हे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाज आणि मराठी माणसांचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष आपल्या भूमिका कधीही अर्पण केल्या नव्हत्या, बाळासाहेब ठाकरे यांनी कधी निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते, असे म्हणत उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंचा पक्ष हा नरेंद्र मोदी यांची बेनामी कंपनी आहे. पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपला की नष्ट होतात. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जेव्हा सत्तेतून जातील तेव्हा हे गांडूळ नष्ट होतील. तो पर्यंत येणारे दसरा-गुढीपाडवा त्यांना साजरे करु द्या. जोपर्यंत दिल्लीत पैसे पुरवले जातील तो पर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात राहील. यांच्याकडे कोणता विचार नाही, बाळासाहेबांचा विचार त्यांना माहिती नाही. नाहीतर दिल्लीची बुट चाटे गिरी त्यांनी केली नसती. बाळासाहेबांचे नाव घेण्याची त्यांची कुवत नाही.
संजय राऊत म्हणाले की, राज्यात दसऱ्यानिमित्त केवळ दोनच मेळावे होत असतात. त्यामध्ये एक नागपूरला रा.स्व.संघाचा आणि दुसरा मुंबईमध्ये शिवसेनेचा गेली अनेक वर्षे सुरू आहे. दोन मेळावे सोडले तर बाकी सर्व मेळावे नंतर आले आहेत. मुंबईमध्ये एकच मेळावा होणार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. इतर मेळाव्यांना तुम्ही जर दसरा मेळावा म्हणत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण दसरा मेळावा हा रा.स्व. संघ आणि ठाकरेंचा असतो, देशभरातील लोकांचे या मेळाव्या कडे लक्ष लागलेले असते.
संजय राऊत म्हणाले की, चोर बाजारात खूप माल विकायला असतो. दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे, मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांचा तिसरा चोर बाजार काढला आहे. त्या चोर बाजारामध्ये त्यांनी राजकारणामधील चोरीचा माल विकण्यासाठी ठेवलेला आहे. त्याला आम्ही आणि जनता शिवसेना मानत नाही. निवडणूक आयोग, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सोडले तर दुसऱ्या जे लोक आहेत त्यांना कुणी शिवसेना मानणार नाही. प्रचंड पैशाचा वापर करत लोकं आणली जातात आणि आमचा दसरा मेळावा असे सांगितले जाते असे म्हणत त्यांनी महायुती वर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, दसरा मेळावा घेतात तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली हे सांगा ना? तुम्ही या महाराष्ट्राला कोणता विचार दिला? तुमचा जन्म कधीचा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कोणत्या गोंधडीमध्ये रांगत होतात मु.. होतात? ही सर्व जण तेव्हा लहान मुले होती. त्यांना वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली त्यांनी जन्माचे दाखले घेऊन यावे. रा.स्व. संघ आणि ठाकरेंचा मेळावा हे दोन मेळावे मुख्य आहेत. बाकी मेळावे होत असतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.