
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२६
नवीन बसस्थानक परिसरात “शनि काढून देतो” असे सांगत एका वृद्धाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात अज्ञात दोन भोंदूंनी संगनमताने वृद्धाकडून सोन्याची अंगठी व ९०० रुपयांची रोकड लंपास करून पळ काढला. ही घटना २० एप्रिल रोजी घडली असून २१ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७, रा. जिल्हा बँक कॉलनी) हे त्यांच्या मुलीकडे घरभरणीच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले होते. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ येऊन शेगावला जाणाऱ्या बसबाबत चौकशी करू लागला. सर्जेराव यांनी माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर त्या इसमाने शेजारी बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीला एक खडा आणण्यास सांगितले.
तो खडा सर्जेराव यांच्या हातात देत “राम-राम” तीन वेळा म्हणण्यास सांगितले. त्यानंतर बंद मूठ उघडल्यावर खड्याऐवजी रुद्राक्ष दिसल्याने सर्जेराव चकित झाले. या बनावाचा फायदा घेत त्या भोंदूंनी त्यांना व शेजारील व्यक्तीला बंद पोलिस चौकीजवळ नेले.
तेथे दुसऱ्या व्यक्तीचे कडे काढण्यास सांगितले आणि सर्जेराव यांना त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी व खिशातील पैसे त्या व्यक्तीकडे देण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघांनाही पुढे चालत जाण्यास सांगितले. काही अंतर गेल्यानंतर सर्जेराव मागे वळून पाहतात तोपर्यंत दोन्ही भोंदू पसार झाले होते.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्जेराव यांनी २१ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेश पदमर करीत आहेत.
अशा प्रकारे भोंदू लोक धार्मिक अथवा अंधश्रद्धेचा आधार घेत नागरिकांची फसवणूक करत असल्याने नागरिकांनी सावध राहावे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.





















