जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ चार शब्दांत या निर्णयावर संताप व्यक्त करत “देशात मनमानी सुरू आहे” अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर थेट भोंगळ कारभाराचा आरोप करत चिंता व्यक्त केली.
मंगळवारी नागपूर खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीत मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश दिला. या निर्णयानंतर राजकीय पक्षांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरेंनी संपूर्ण परिस्थितीवर ‘चार शब्दात’ केलेली टिप्पणी मोठ्या चर्चेला कारणीभूत ठरली.
रोहित पवार यांनीही या निर्णयावर कठोर टीका केली. ते म्हणाले, “नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली असून 21 डिसेंबरपर्यंत सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “हा निकाल म्हणजे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तबच आहे. आयोग जर पक्षाच्या दावणीला बांधला तर राज्यात गोंधळ होणारच.”
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह भाजपावरही थेट हल्ला चढवला. राज्यात आज निर्माण झालेल्या गोंधळासाठी भाजपासुद्धा तितकीच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.
बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदाराला पळवून लावल्याच्या घटनेवरही रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही आयोगाला सातत्याने दुबार मतदारांवर कठोर कारवाईची विनंती केली, पण कोणतीच दखल घेतली गेली नाही. सत्ताधारीच बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालत आहेत.” स्थानिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला पोलिसांपासून दूर नेण्यात आमदार गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने सक्रिय भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणावर अधिक भाष्य करताना पवार म्हणाले, “सत्ताधारी दिवसाढवळ्या मतदान प्रक्रियेत घोळ घालत आहेत आणि आयोग मात्र झोपा काढत आहे. मालकांविरोधात काहीच करायचं नाही हे आयोगाने ठरवलंय का?”




















