जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी लाच घेताना अटक करण्यात येत असताना आता अशातच चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांना नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना १५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठ्याचा ही पदभार होता. तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील यांनी दुपारी २ वाजता ४ हजार रुपयांची लाच मागितली होती.
फिर्यादीने जळगाव आणि नंदुरबार लाचलुचपत विभागाला कळवल्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी ५ वाजता कार्यालयातच ४ हजार रुपये स्वीकारताना दिलीप पाटील यांना पकडण्यात आले. या कारवाईत नंदुरबारचे लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेडकॉन्स्टेबल हेमंत महाले आणि जळगाव विभागाचे कर्मचारी यांचा समावेश होता.