
जळगाव मिरर | १७ जून २०२४
देशातील पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग येथे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कांचनजंगा एक्सप्रेस (13174) ला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात कांचनजंगा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ६० जण जखमी आहेत. पूर्व रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या बाजूला दोन पार्सल आणि एक एसएलआर कोच जोडण्यात आला होता. त्यात प्रवासी नव्हते. दोन लोको पायलट आणि एका गार्डसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रेनच्या 5 डब्यांचे नुकसान झाले आहे. फिटनेस चाचणीनंतर ट्रेन सियालदहला रवाना केली जाईल. रेल्वे सेवा सिंगल लाईनवर सुरू करण्यात आली आहे. कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जात होती. लाल सिग्नलमुळे एक्स्प्रेस ट्रेन सिलीगुडीतील रंगपानी स्टेशनजवळ रुईधासा येथे थांबवण्यात आली. दरम्यान, मागून येणाऱ्या मालगाडीने त्यांना धडक दिली. मुसळधार पावसामुळे मालगाडीच्या पायलटला सिग्नल दिसला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टक्कर इतकी जोरदार होती की एक्स्प्रेस ट्रेनचा एक डबा मालगाडीच्या इंजिनला हवेत लटकला. इतर दोन डबे रुळावरून घसरले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह रेल्वे आणि बंगालचे अधिकारीही बचाव कार्यात गुंतले आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे म्हणाले – ज्या ट्रॅकवर हा अपघात झाला तो रात्रीपर्यंत कार्यान्वित केला जाईल. डाऊन कांचनजंगा एक्स्प्रेसही रात्री धावणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीहून दार्जिलिंगला रवाना झाले आहेत.






















