जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२५
भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळातील महिला भाविकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी कळवणजवळ घडला. या घटनेने शहरातील पासी वाड्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. गौरीबाई बटलू पासी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेवर गुरुवारी रात्री भुसावळात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी कळवण पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पासी वाड्यातील २० ते २२ भाविक सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेसाठी निघाले आहेत. गुरुवारी कळवणजवळ एका कारने गौरीबाई यांना जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना कळवण येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी कळवण पोलिसांत कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. कळवण येथे शवविच्छेदन करुन भाविक महिलेवर गुरुवारी रात्री भुसावळात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत गौरीबाई पासी यांच्या पश्चात पती, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. आठवडे बाजारात रस्त्यावर बसून त्या खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करुन परिवाराचे पालनपोषण करीत होत्या. शासनाकडून त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळण्याची मागणीही पासी समाजबांधवांनी केली आहे