जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४
गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार उपोषण सुरु असतांना सध्या मनोज जरांगे पाटलांचे सहकारी असलेले अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांवर आरोप केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली आहे.
“मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला आहे. एकमताने या कायदाला मान्यता देण्यात आली. पण मनोज जरांगे यांना हा कायदा मान्य नाही. ते पुन्हा आंदोलनाला लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी म्हणालो की, हे मारुतीचं शेपूट असून कधीच संपणारं नाही. एकामागून एक मागण्या त्यांच्याकडून पुढे केल्या जातात. जरांगेंना कायदा आणि नियमांबाबत काहीही कळत नाही. आता त्यांनी रस्ते बंद करण्याचे आणि सामूहिक उपोषन करण्याचं आवाहन केलं आहे. जर या उपोषणामुळं कुणी दगावलं तर जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजभल यांनी केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसविण्यास सांगितलं आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. वयोवृद्धांना व्याधी असू शकतात आणि त्यातून ते उपोषणाला बसल्यानंतर काही बरं-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार? उपोषणामुळं कुणी दगावलं, तर याची जबाबदारी मनोज जरांगेवर टाकावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी राज्यातील पोलिसांना आवाहन केलं आहे की, जरांगेंच्या उपोषणामुळं जर कुणी मृत्यूमुखी पडल्यास जरांगेवर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा, असेही भुजबळ म्हणाले.