जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरी प्रकरणात शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला. हैदराबादमधील एका न्यायालयाने चेंगराचेंगरीदरम्यान झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणात अभिनेत्याला नियमित जामीन मंजूर केला आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनच्या नियमित जामीन याचिकेवरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय सुनावताना जामीन मंजूर केला न्यायालयाने ५० हजारांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन दिल्याची माहिती अभिनेत्याच्या वकिलांनी दिली. याप्रकरणात गत रविवारी पोलिसांनी अल्लू अर्जुनची जवळपास साडेतीन तास चौकशी केली होती. हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहाबाहेर ‘पुष्पा-२’च्या विशेष स्क्रीनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा
मुलगा जखमी झाला होता. याप्रकरणात आरोपी क्रमांक ११ म्हणून अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात अभिनेत्याला १३ डिसेंबर रोजी अटक करत नामपल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. पण, याप्रकरणात त्याचदिवशी तेलंगाणा उच्च न्यायालयाने अभिनेत्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.