
जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२६
बोगस कॉल सेंटर प्रकरणी नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असून, तब्बल ७महिन्यांच्या अटकेनंतर कारागृहातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. एल. के. फार्म हाऊस येथे नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून इंग्लंडसह अन्य देशांमधील नागरिकांना विविध आमिषे दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटर सुरू होते.
२८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या फार्म हाऊसवर धाड टाकली होती. या प्रकरणी जागा मालक म्हणून ललित कोल्हे यांच्यासह ८ जणांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर ललित कोल्हे नाशिक कारागृहात होता. जामीन मिळवण्यासाठी कोल्हे यांनी यापूर्वी जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर २४ रोजी ललित कोल्हेचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.





















