जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहे. यात अनेकांचे जीव देखील गेले असताना आता नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इगतपुरीच्या माजी आमदार आणि शिंदे गटाच्या नेत्या निर्मला गावित यांचा नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. घराबाहेर नातवाला घेऊन फेरफटका मारत असतानाच पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, कारने त्यांना काही फुटांपर्यंत फरफटत नेले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून, सध्या नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी निर्मला गावित यांचा हा अपघात घडला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले असून ते पाहून अंगावर काटा येतो. निर्मला गावित आपल्या नातवासोबत घराबाहेर चालत होत्या. त्यावेळी अचानक मागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली. धडक बसताच गावित कारच्या बोनेटवर आदळल्या, तरीही चालकाने गाडी न थांबवता त्यांना पुढे फरफटत नेले. सुदैवाने त्यांचा नातू थोडा बाजूला असल्याने तो या अपघातातून बालंबाल बचावला.
अपघातानंतर निर्मला गावित यांनी रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते, म्हणूनच मी वाचले. मी नातवासोबत वॉक करत होते. नातवाचा हात धरलेला नव्हता, त्यामुळे तो बाजूला होता. अचानक मागून ‘धड’ असा आवाज आला आणि मी थेट बोनेटवरच पडले. त्यानंतर मला काही आठवत नाही, थेट रुग्णालयातच मला समजले. काल खूप त्रास होत होता, पण आज डॉक्टरांच्या उपचारामुळे मी रिलॅक्स आहे,” असे निर्मला गावित यांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर अपघातामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भरधाव कार चालकावर पोलिस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निर्मला गावित यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं निर्मला गावित पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं.




















