
संगमनेर : वृत्तसंस्था
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील चार भाऊ आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चौघाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळं वांदरकडा या गावावर शोककळा पसरली आहे. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळं हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे आणि विराज अजित बर्डे अशी मृत्यू पावलेल्या चौघा भावांची नावं आहेत. हे चौघेही वांदरकडा गावाजवळील बर्डे वस्तीत रहायला होते. या वस्तीजवळ छोटसं तळं असून या तळ्यावरुन महावितरणच्या वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. जेव्हा ही भावंड तळ्यात पोहण्यासाठी गेली तेव्हा या तारा तुटून तळ्यात पडल्या होत्या. पण पण्यातून वीजप्रवाह सुरु असल्याची बाब लक्षात आली नाही आणि ते थेट पाण्यात उतरले. यानंतर वीजेचा तीव्र झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर वीजेच्या तारा तुटून पाण्यात पडल्याचं लक्षात आलं. यानंतर तातडीनं वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं तसेच पोलीस आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या.




















