जळगाव मिरर | १६ जुलै २०२४
देशातील जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी सोमवारी रात्री ७:४५ वाजता देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे २४ तासांपूर्वी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत ठार झालेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच सतर्क पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली, त्याच दिवशी रियासी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे बस खड्ड्यात पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. ९ ते ११ जून दरम्यान दहशतवाद्यांनी चारवेळा हल्ले केले होते.