
जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील ट्रान्सपोर्टच्या दुकानात सुगंधित पान मसाला विक्रेत्यावर शहर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बळीरामपेठ परिसरातील जळगाव फ्रेंडस ट्रान्सपोर्ट दुकानात सुगंधित पान मसाला विक्री होत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, विजय पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २वाजता धडक कारवाई केली. या कारवाईत दुकानातून सुगंधित पान मसाल्याचा २ लाख २५ हजार रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहेकॉ राजकुमार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विक्रेता दीपक महाराजसिंग यादव (वय-४२ , रा. रोहणवाडी, जळगाव ) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.