जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४
लहान मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा. गायन, वादन, नृत्य या कलांमधून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा. यासोबतच त्यांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा यांची तसेच आपल्या परंपरागत लोकवाद्यांची माहिती व्हावी यासाठी अखिल भारती मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषद ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम राज्यभर राबवित आहे. या उपक्रमातंर्गत दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जिल्हाभरातील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ला.ना. सार्वजनिक विद्यालय येथून होणार आहे.
महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा पुढील पिढीकडे पोहचावी. विद्यार्थ्यांना लोककला व लोकवाद्य यांची माहिती व्हावी. या माध्यमातून लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी या उद्देशाने ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेतर्फे राबविण्यात येत आहे. हा महोत्सव दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण व दुसऱ्या टप्प्यात सादरीकरण असे स्वरुप आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा उपक्रम राज्यभरात सुरु झाला असून, दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्ह्यात लोककला प्रशिक्षण कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना लोकवाद्यांची ओळख, त्यांचे स्वरुप तसेच आपल्या खान्देशातील विविध लोककलांविषयी माहिती देण्यात येणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळांनी व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासंदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून, कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घेवून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व लोकपरंपरा यांची माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के सामंत, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल ठाकूर, नेहा पवार, आकाश बाविस्कर यांनी केले आहे. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ९६५७७०१७९२, ९४२२७ ८२२४७, ७६२०९३३२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.