जळगाव मिरर | २१ जून २०२४
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शुक्रवार ता. २१ जून रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात सुप्रसिद्ध योग गुरु निशिता रंगलानी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी एका विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या योग शिबिराचे उद्घघाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे शुभ हस्ते करण्यात आले व त्यांनीच या योग शिबिराचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, “योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे, सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणीत फायदे शोधले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगतानाच, योगसाधणेचे महत्व व विविध योगासनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. सदर व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या शिबिरात योग गुरु निशिता रंगलानी यांनी आजच्या या धकाधकीच्या जीवनात दररोज सकाळी स्वतःसाठी एक तासाचा वेळ काढून योगाची विविध आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. योगाने अनेक व्याधी सहज दूर करता येतात व ध्यानधारणा केल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते तसेच ऑफिसचे काम, अभ्यास करताना फोकसच करता येत नाही त्याकरिता एकाग्रता वाढविण्यासाठी आपण प्रामुख्याने काही खास योगा प्रकारांचा वापर करून आपली एकाग्रता वाढवू शकतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने रोज योगाभ्यास केला पाहिजे, यावेळी त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाश्वत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध योगासनाचे प्रत्यक्ष कृतीतून धडे दिले व विविध योगासने विद्यार्थ्याकडून करून घेत मार्गदर्शन केले. तसेच या शिबिराच्या शेवटी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी विद्यार्थ्यांना युवा पिढी मधील शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखांकित करताना योगासनाचा नियमित अंगीकार करण्याचे आव्हान केले. या योग शिबिराचे आयोजनासाठी प्रा. वसीम पटेल यांनी विशेष समन्वय साधले तर या शिबिरात महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनीसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद यांनी सक्रिय सहभाग नोंदवून हे योग शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सदर शिबिराचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
