
जळगाव मिरर | १५ मे २०२३
राज्यात ठाकरे व शिंदे गटातील राजकारण पुन्हा एकदा तीव्र स्वरूपात दिसून येत असले तरी आता न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनी स्वीकारला आहे. तर अशातच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत गुवाहाटीची ती आठवण सांगितली आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले कि, जळगाव जिल्ह्याचे पाच आमदार गेले होते, त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले. नागपूरचा ही पळून गेला, बुलढाण्याचाही पळून गेला, जळगावचे गेले नाशिकचे गेले, दादर ठाण्याचे सर्वच आमदार शिंदे सोबत गेले. नाशिक ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं ?सर्वच शिंदे सोबत पळून गेले, चार खांदे गेले तर मी एकटा काय करू?, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. त्यावेळेस मी सत्तेची लालसा केली नाही, मी तर मंत्रिपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती. आम्ही सट्टा खेळलो, हिंदुत्वाकरता सट्टा खेळलो. ज्या भगव्या झेंड्याकरता बाळासाहेबांनी आयुष्य वेचलं, त्या भगव्या झेंड्याला वाचवण्याकरता भाजपसोबत आम्ही गेलेलो आहोत. आम्ही हे पाप केलं असेल तर लोकांनी पाप म्हणावं.
आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणाकरता शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तेवत ठेवून भाजपसोबत पुन्हा युती केली, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. जर मी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये जी कामं होत आहेत, ती आपल्या मतदारसंघामध्ये झाली नसती, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. संजय राऊतांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? ते कोण आहेत, सुप्रीम कोर्टाचे जज आहेत? झोपेतून उठतं आणि बोलतं, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना है. याची ठाण्यामध्ये डोक्याची टेस्ट केली पाहिजे, असा टोलाही गुलाबरावांनी लगावला.





















