जळगाव मिरर | २० मे २०२५
शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये टोळक्याने हैदोस घालीत तोडफोड केली. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तोडफोड केल्यानंतर टोळक्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेवून गेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या हॉटेल शुगर अॅण्ड स्पाईसी या हॉटेलमध्ये काही तरुण जेवणासाठी आले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर त्या टोळक्याने हॉटेलमध्ये वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी शिवीगाळ करीत टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेलच्या मालकासह कामगारांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली. मात्र तोपर्यंत धुडगूस घालणारे टोळके तेथून पसार झाले होते. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर टोळक्याने हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरची तोडफोड करुन घेवून गेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल केलेला नव्हता.





















